वस्तुनिष्ठतावादाचा पाया...



द फाऊंटनहेड. लेखिका आयन रँड.
डझनभर प्रकाशकांनी हे पुस्तक नाकारलं होतं. एकाने हिंमत दाखवली. प्रकाशित केलं आणि या पुस्तकाने इतिहास घडवला. विकिपेडियावर विश्वास ठेवायचा तर आजवर या पुस्तकाच्या साडेसहा कोटी प्रती खपल्या आहेत. हा झाला अधिकृत प्रतींचा आकडा. पण उच्च नीतिमूल्यांचा संदेश देणा-या या पुस्तकाच्या अनधिकृत प्रतीही कोटींच्या संख्येने विकत गेल्या आहेत. महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतर कधीतरी कुणीतरी या पुस्तकाबद्दल सांगतं. आपण ते मिळवतो. वाचतो आणि त्याच्या प्रेमात पडतो. हे पुस्तक आपल्याला झपाटतं. आजवर मनावर कोरण्यात आलेल्या तत्वविचारांबाबत शंका निर्माण करतं. धार्मिक, अध्यात्मिक, आर्थिक, सामाजिक अशा सगळ्याच भूमिका तपासून घ्यायला लावतं. हे गेली सात दशकं असंच सुरू आहे. यापुढेही अनेकांच्या विचारांवर ही कादंबरी आणि रँड यांचा ऑब्जेक्टिव्हिजम असाच परिणाम करीत राहील. एवढी परिणामकारक, एवढी नावाजलेली ही कादंबरी. तिच्यावर तेवढ्याच प्रमाणावर टीका झाली आहे, ती तेवढीच धिक्कारली गेली आहे. असं काय आहे या कादंबरीत की अनेकांना तिची भीती वाटते? ज्या कादंबरीने अनेकांना जगण्याची दिशा दिली, तीच अनेकांना लगदा-वाङ्मयाहूनही हीन वाटते? या कादंबरीच्या या यशाचं गमक कशात आहे? हे नेमकं काय रसायन आहे? हे पाहण्यासाठी आधी आपल्याला दुस-या महायुद्धापर्यंत जावं लागेल. 

दुसरं महायुद्ध तेव्हा ऐन भरात आलं होतं. दोस्त राष्ट्रांनी जर्मनी, इटली, जपानला चांगलंच चेपलं होतं. आणखी दोन वर्षांनी दोस्त राष्ट्रांच्या विजयानं हे युद्ध संपणार होतं. नाझी आणि फॅसिस्टांचाच पराभव होणार होता. ब्रिटनच्या साम्राज्यवादाला घरघर लागणार होती आणि रशियातील स्टालिनशाही बळकट होणार होती. पण त्याला अजून दोन वर्षं बाकी होती. फाऊंटन हेडचा जन्म या काळातला. १९४३ चा. पण या कादंबरीत दुस-या महायुद्धाबद्दल अवाक्षरही नाही. त्या काळात आयन रँड अमेरिकेत होत्या म्हणून बहुधा तसं झालं असेल. कारण जगासाठी भयंकर असलेलं ते युद्ध अमेरिकेसाठी फायदेशीरच होतं. पण तरीही इथं एक बाब दुर्लक्षिता येणार नाही. रँड यांची जन्मभूमी. त्या मुळच्या रशियातल्या. ज्यू कुटुंबातल्या. त्यांचा धर्म आवर्जून सांगायचं कारण म्हणजे या महायुद्धापूर्वीचा काही वर्षांचा इतिहास हा ज्यूंच्या शिरकाणाचा आहे. तशात रँड यांनी रशियातली राज्यक्रांतीही पाहिलेली होती. ऑक्टोबर क्रांतीच्या वेळी त्या सतरा वर्षांच्या होत्या. हे तसं कळतं वय. तशात रँड यांना पहिल्यापासून इतिहास, तत्वज्ञान या विषयांत रस. लेनिनवादाने रशिया भारलेला असतानाच्या काळात त्या पेट्रोगार्ड विद्यापीठात अरिस्टॉटल, प्लेटो आणि नित्शे शिकत होत्या. त्याचवेळी हुकूमशाही कामगारांची असो वा बुर्झ्वांची, तिचे चटके सारखेच असतात हेही अनुभवत होत्या. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता रँड यांच्या कादंबरीवर – जी जीवनाचे तत्वज्ञान सांगू पाहाते तिच्यावर युद्धाची पडछाया असणं अपरिहार्य होतं. पण फाऊंटनहेडमध्ये हे युद्ध दिसत नाही. त्यातलं युद्ध दुसरंच आहे.


हे युद्ध व्यक्तीचं, व्यक्तीसाठीचं आहे. ते मीचं आहे. नाझीवाद आणि फॅसिझम (याला हिंदीत अत्यंत समर्पक शब्द आहे. फासीवाद!) या विरोधातील साम्यवाद आणि समाजवाद या सर्व तत्वज्ञानांच्या तळाशी व्यक्ती आहे. पण ती दबलेली आहे. समूहवादाची बळी आहे. हे रँड यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं होतं. त्या १९२६ मध्ये अमेरिकेत आल्या. तिथली भांडवलशाहीवादी लोकशाहीही त्यांनी अनुभवली. त्यातून त्यांच्या लक्षात आलं की या सगळ्यात माणसाला जागाच नाही. उलट माणसाला शृंखलाबद्ध करणं हाच या सर्व विचारांचा मूळ हेतू आहे. माणसाचं निवड करण्याचं स्वातंत्र्य काढून घेतल्यावर मग बाकी काही शिल्लकच राहात नाही. रँड यांचं म्हणणं असं, की आजवर तेच घडत आलेलं आहे. खरंतर कोणत्याही तत्वज्ञानात सगळ्यात पुढं आणि सगळ्याच्या आधी माणूसच असला पाहिजे. प्रामाणिक, स्वतंत्र, शुद्ध, स्व-अर्थी/स्वार्थी असा माणूस. आजवर धार्मिक तत्वज्ञानांनी आदर्श म्हणून जो सांगितला आहे त्याच्या नेमका उलटा माणूस. जसा फाऊंटनहेडचा नायक हॉवर्ड रोआर्क.

रोआर्क हा एक आर्किटेक्ट. प्रज्ञावंत, बंडखोर. जुन्या कल्पना, जुनी मूल्ये यांपलीकडे जाऊन निर्मिती करणारा. समाजामध्ये प्रस्थापित असलेल्या कलाविचारांना आपल्या इमारतींतून आव्हान देणारा. त्यासाठी जे काही सोसायचे ते सोसण्याची तयारी असलेला. प्रचंड नैतिक. प्रचंड स्वतंत्र. त्याच्या बरोबर महाविद्यालयात असलेला पीटर किटिंग हे त्याचे दुसरे टोक. नैतिक मूल्यांपासून आर्थिक मूल्यांपर्यंत तडजोडी करणारा. तो आयुष्यात यशस्वी होतो. रोआर्कला काम मिळवण्यासाठीही धडपडावं लागतं. पण रोआर्कचा संघर्ष किटिंगशी नसतोच. तो असतो किटिंगसारख्यांना (सँक्शन या अर्थी) मान्यता देणा-यांशी. आयन रँड यांनी ते काम सोपवलंय एल्सवर्थ टूहे या आर्किटेक्ट समीक्षकावर. (हे पात्र समाजवादी विचारवंत हेरॉल्ड लास्की यांच्यावर बेतलेलं आहे असे म्हणतात.) हा टूहे फाऊंटनहेडचा खरा खलनायक आहे. तो समष्टीवादी आहे.

माणसाने समाजासाठी जगावं. स्वार्थी असू नये. आपल्या जीवनापेक्षा इतरांच्या जीवनाला महत्त्व द्यावं. आपण भुकेलो असलो तरी चालेल पण दुस-या भुकेल्यास अन्न द्यावं. त्यातच खरी माणुसकी आहे. पैसा हे पाप आहे. त्याच्या मागे लागू नये. ही सर्वमान्य तत्वं. धर्म तेच सांगतो. विविध तत्वज्ञानी, संतमहात्मे, समाजसेवक तीच सांगतात. फाऊंटनहेडमधला टूहे तीच सांगतो. रोआर्कचा (म्हणजेच रँड यांचा) अशा सर्व प्रमेयांना विरोध आहे. त्यांचं म्हणणं ही सर्व शिकवण माणसाच्या जीवनाच्याविरोधी आहे. माणसाला परतंत्र ठेवणारी आहे. माणसांवर सत्ता गाजवू इच्छिणारांची ही निर्मिती आहे. तिचा त्याग केला पाहिजे. पण मग असा माणूस म्हणजे राक्षसच असणार. रँड सांगतात - नाही. उलट तो आदर्श माणूस असणार. जसा की रोआर्क. हे जग चालवतात ती रोआर्कसारखी माणसं. निर्मितीक्षम माणसं. बुद्धिनिष्ठ माणसं. त्यांची निर्मिती हा त्यांच्या आनंदाचा भाग असतो. ती एक अत्यंत स्वार्थी क्रिया असते. केवळ तशा प्रकारे स्वतःसाठी जगण्यातूनच तो मानवजातीस ललामभूत अशा गोष्टींची निर्मिती करू शकतो.
     
फाऊंटनहेडमधल्या रोआर्कच्या सगळ्या असण्यातून हेच तत्वज्ञान दिसतं. अनेक प्रसंगांतून ते येतं. रोआर्क आणि त्याची प्रेयसी डॉमिनिक फ्रँकन यांच्या प्रेमातून येतं आणि तिच्या पसंतीने त्याने तिच्यावर केलेल्या बलात्कारातून येतं, तसंच ते रोआर्क आणि माध्यमसम्राट गेल वेनान्ड यांच्यातील चकमकींतून येतं. या कादंबरीतील गेल वेनान्ड हे खूप भारी पात्र आहे. रोआर्कशी मिळतंजुळतं पण रोआर्क बनू न शकलेलं. वेनान्ड गरीबीतून स्वतःच्या हुशारीवर वर आलेला आहे. तो एका बड्या माध्यमसमूहाचा मालक आहे. न्यू यॉर्क बॅनर हे त्याचे वृत्तपत्र. त्याची भूमिका ठरविण्यासाठी वेनान्डने एक प्रयोग केला होता. एकाच अंकात त्याने दोन बातम्या प्रसिद्ध केल्या. एक होती वैज्ञानिकाची. खूप महत्त्वाचं संशोधन तो करीत होता. पण त्याच्याकडे पैसेच नव्हते. दुसरी बातमी होती एका घरकाम करणा-या तरूणीची. एका गुंडाची ती प्रेयसी. त्याच्यापासून तिला दिवस गेलेले. या दोघांनाही मदतीसाठी त्याने वाचकांना आवाहन केले. मोहीमच चालवली त्याने. अखेर त्या तरूण वैज्ञानिकाला लोकांनी दिले नऊ डॉलक आणि ४५ सेंट. त्या कामवाल्या तरूणीला मिळाले एक हजार ७७ डॉलर. वेनान्डने त्या दोन्ही बातम्या आणि ते पैसे टेबलवर ठेवले आणि त्याच्या कर्मचा-यांना विचारले, याचा अर्थ काय आहे हे समजलं नाही असं कुणी आहे का इथं?

अशा एकेक प्रसंगातून आयन रँड सगळ्या जुन्या तत्वविचारांवर, धार्मिक नीतिमूल्यांवर आघात करीत जातात. कादंबरीत शेवटी-शेवटी येणारा न्यायालयीन खटला या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. रोआर्कने गरीबांसाठीचा एक गृहनिर्माण प्रकल्प उद्ध्वस्त केला आहे. त्या गुन्ह्यासाठी त्याला न्यायासनासमोर उभं केलेलं आहे. तिथं आरोपीच्या पिंज-यातून तो जे भाषण करतो तो या कादंबरीचा उत्कर्षबिंदूच म्हणावा लागेल. त्या भाषणातून रँड यांनी जणू आपल्या वस्तुनिष्ठवादाची पहिली वीटच रचली आहे. हे तत्वज्ञान आहे मुक्त अर्थव्यवस्थेच्या जोडीने उभ्या असलेलं व्यक्तिस्वातंत्र्याचं. मानवी स्वातंत्र्याचं.

आजवर आपल्याला जे जे सांगण्यात आलं, शिकवण्यात आलं, आपल्या मनांवर कोरण्यात आलं ते सगळं तहसनहस करण्याची ताकद या कादंबरीत आहे. कदाचित कालांतराने रँड यांचं हे तत्वज्ञान आपणांस चुकीचं वाटू लागेल. पण त्या वाटण्यातही बुद्धीचा नव्हे तर भावनांचाच वाटा जास्त असेल...

(पूर्वप्रसिद्धी : लोकसत्ता, बुकमार्क, १० जाने. २०१५)

No comments: